kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“युती झाली नाही तर कार्यकर्ते मरतील” ; गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली भीती

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या चर्चा सध्या होताना दिसून येत आहेत. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे. सर्व निवडणुका या महायुती म्हणूनच लढवणार आहोत, मात्र जिथे आपला चांगला उमेदवार असेल तिथे त्याचा बळी जाऊ देणार नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढत होतील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तर, भाजप एकीकडे युतीबाबत बोलते, तर दुसरीकडे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करते, अशी सूचक टीका राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, युती झाली नाही तर कार्यकर्ते मरतील, भाजप शंभर जागा लढेल तिथे आम्ही आमच्या ताकतीनुसार पन्नास जागा तरी लढूच, पण असे करू नका यामुळे कार्यकर्त्यांचे नुकसान होईल, अशी भूमिका गुलाबराव पाटील यांनी मांडली आहे.

युती न झाल्यास कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होईल, ते “मरून जातील,” त्यामुळे भाजपाने कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी युती करावी, लोकसभा विधानसभेला कार्यकर्ता काम करतो, त्यामुळे दोन-चार जागा इकडे तिकडे करा, पण कार्यकर्त्याला मोठं करण्यासाठी हीच निवडणूक असते, असं गुलाबराव पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे. लोक आता हुशार झाले आहेत. पहिल्यांदा निवडून येणं सोपं असतं, पण सलग तीन-चार वेळा निवडून येणारा नेता खरा असतो. शिवसेनेचं नुकसान संजय राऊत या एकट्या माणसामुळे झालं, अशी टीकाही त्यांनी यावेळी राऊतांवर केली.

दरम्यान, राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र या निवडणुका कशा लढवल्या जाणार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये या निवडणुका लढवल्या जाणार की? काही पक्ष स्वबळाचा नारा देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.