जगातील अनेक देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. रशिया-युक्रेन युद्धाला जवळपास तीन वर्षे झाले आहेत, पण अद्यापही दोन्ही देशातील संघर्ष थांबलेला नाही. यातच अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर मोठा हवाई हल्ला करून तेथील राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केलं. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली. असं असतानाच आता दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये तणाव वाढल्याची माहिती समोर आली आहे.
दक्षिण कोरियाचे कथित ड्रोन पाडल्याचा दावा उत्तर कोरियाने केला आहे. दक्षिण कोरियाने हवाई हद्दीचं उल्लंघन केल्याचा आरोप उत्तर कोरियाकडून करण्यात आला आहे. शनिवारी उत्तर कोरियाने म्हटलं की, या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण कोरियाच्या ड्रोनने त्यांच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि हवाई हद्दीचं उल्लंघन केलं.
दरम्यान, उत्तर कोरियाच्या सरकारी मीडियाच्या हवाल्याने रॉयटर्सने हे वृत्त दिलं आहे.वृत्तानुसार, ४ जानेवारी रोजी काही ड्रोन उत्तर कोरियाच्या हवाई हद्दीत घुसले. मात्र, त्यानंतर उत्तर कोरियाच्या सैन्यांनी ते तात्काळ पाडले. हे ड्रोन दक्षिण कोरियाच्या इंचियोन शहराजवळील एका बेटावरून आले होते आणि या ड्रोननी सुमारे ८ किलोमीटर प्रवास केल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला आहे.
या ड्रोनमध्ये पाळत ठेवणारे कॅमेरे होते आणि उत्तर कोरियाच्या प्रमुख सुविधांचं छायाचित्रण करण्यासाठी त्याचा वापर केला जात होता. या ड्रोनचे अवशेष आणि या इलेक्ट्रॉनिक उपकरणातून मिळालेले हवाई छायाचित्रांमधून ही माहिती समोर आली असल्याचा दावा उत्तर कोरियाकडून करण्यात आला आहे.
दक्षिण कोरियाने काय म्हटलं?
उत्तर कोरियाच्या आरोपानंतर दक्षिण कोरियाच्या लष्कराने हे आरोप फेटाळून लावले आहेत. दक्षिण कोरियाने म्हटलं की, उत्तर कोरियाच्या माध्यमांनी दाखवलेले ड्रोनच्या वृत्तात तथ्य नाही. उत्तर कोरियाने दिलेल्या तारखेला ड्रोन उडवले नाहीत. पण तरी ड्रोन सीमा ओलांडून गेले आहे का? याची चौकशी केली जाईल.
“उत्तर कोरियाला चिथावणी देण्याचा आमचा कोणताही हेतू नाही आणि आम्ही तणाव कमी करण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना आणि प्रयत्न करत राहू”, असं दक्षिण कोरियाच्या लष्कराने एका निवेदनात म्हटल्याचं वृत्तात म्हटलं आहे.












