अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक पातळीवरील ६६ संघटनांमधून अमेरिका माघार घेत असल्याचे म्हटले आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आल्यानंतर ‘व्हाइट हाऊस’ने याबाबत माहिती दिली आहे. जागतिक पातळीवर संघटना अमेरिकेला फायदा करून देत नाहीत, असे ट्रम्प यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. जानेवारी २०२५ मध्ये अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) बाहेर पडली होती. आता अमेरिकेने आणखी ६६ संघटनांमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या काही संघटनांमधून तसेच जागतिक पातळीवरील इतर संघटना अशा एकूण ६६ संघटनांमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना अटक केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. अमेरिकेच्या हितासाठी संघटना काम करत नसल्याचे ट्रम्प म्हणाले. तसेच अमेरिकन नागरिकांचा टॅक्सचा पैसा इतर चांगल्या कामांमध्ये वापरता येईल, असा युक्तिवाद ट्रम्प यांनी केला आहे.
जागतिक पातळीवरील संघटना ‘ग्लोबलिस्ट अजेंडा’च्या नावाखाली अमेरिकेच्या हितासाठी काहीच करत नाहीत, असे म्हणत ट्रम्प यांनी ६६ संघटनांमधून माघार घेतली आहे. ट्रम्प म्हणाले, संघटनांमधून माघार घेतल्याने अमेरिकेतील टॅक्सचा पैसा इतर कामांमध्ये वापरता येईल. जागतिक पातळीवरील संघटना अमेरिकेच्या फायद्यासाठी काहीच करत नाहीत. समस्यांवर प्रभावीपणे काम न करणाऱ्या संघटनांना इथून पुढे पैसा दिला जाणार नाही. अमेरिकेचा पैसा इतर मिशनसाठी वापरला जाईल.” ट्रम्प यांनी माघार घेतलेल्या संघटनांमध्ये हवामान, लैंगिक समानता, महिला सशक्तीकरण या समस्यांवर काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या संघटनांचा समावेश आहे.
हवामान बदल या जागतिक समस्येवर काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदलाशी संबंधित संघटनेतून ट्रम्प यांनी माघार घेतली आहेत. तसेच त्यांनी UN वूमन आणि UN प्रदूषण निधी मध्ये यापुढे पैसे देणार नसल्याचे जाहीर केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामकाजातून तसेच आर्थिक निधी देण्यात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात माघार घेतली आहे. दरम्यान, जागतिक पातळीवरील संघटनांना अमेरिका सर्वात जास्त निधी देत असूनही त्या चीनला अधिक महत्व देतात, असा आरोप ट्रम्प यांनी वेळोवेळी केला आहे.
WHO मधून माघार घेताना चीनवर आरोप
अमेरिकेने जानेवारी २०२५ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेतली होती. अमेरिका WHO ला अधिक निधी देतो, तरी जागतिक आरोग्य संघटना चीनला अधिक महत्व देत असल्याचे कारण ट्रम्प यांनी त्यावेळी दिले होते. तसेच अमेरिका इतर देशांच्या तुलनेत अधिक निधी देत असल्याचे ते म्हणाले होते. चीनची लोकसंख्या १.४ अब्ज आहे. चीनची लोकसंख्या ही अमेरिकेपेक्षा ३०० टक्क्यांनी जास्त आहे, तरी चीन ९० टक्के कमी निधी WHO ला देत असल्याचे ट्रम्प म्हणाले होते.












