विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पुणे जिल्ह्यातून विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विक्रम काकडे हे माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पुण्यातील जिजाई बंगल्यावर पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर अखेर विक्रांत काकडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. दरम्यान, संजय काकडे आणि विक्रांत काकडेंनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विक्रम काकडे आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरे हे दोघेही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पुण्यातील जिजाई निवासस्थानी आज माजी खासदार संजय काकडे आणि त्यांचे पुत्र विक्रम काकडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. यावेळी पक्षाचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शहर व ग्रामीण भागातील अनेक नेते इच्छुक होते. मात्र, पक्षाने विक्रम काकडेंना उमेदवारी दिल्यानंतर काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिजाई निवासस्थानी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर पक्षश्रेष्ठींनी शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे या दोघांनाही उमेदवारी अर्ज भरण्याचे निर्देश दिले आहेत.
विक्रम काकडे हे दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत.













Leave a Reply