राज्यभरातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक आरोप-प्रत्यारोप, बोटावरील शाई, दुबार मतदार, ईव्हीएम, वादविवाद, हाणामारी आणि गोंधळाने भरलेल्या महानगरपालिका निवडणूकांसाठी गुरुवारी सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात झाली आणि सांयकाळी ५.३० पर्यंत मतदान पार पडले.
लोकसभा आणि विधानसभेत असलेली महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत यावेळी पाहायला मिळालेली नाही. या निवडणूकांमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या युत्या आघाड्या दिसल्या. अनेक ठिकाणी मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात उभे होते तर, बऱ्याच ठिकाणी एकमेकांचे विरोधक सोबत आले होते. विशेषत: मुंबईत भाजप-शिवसेना-रिपाइं ही महायुती आणि ठाकरे बंधूंसह शरद पवार गट या राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदारांनी १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद केले असून २९ महानगरपालिकांवर कुणाची सत्ता येणार, याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदार रांगेत उभे होते.
मतदानाची टक्केवारी (दुपारी ३.३० पर्यंत)
बृहन्मुंबई – ४१.०८
ठाणे – ४३.९६
कल्याण-डोंबिवली – ३८.६९
नवी मुंबई – ४५.५१
उल्हासनगर – ३४.८८
भिवंडी – ३८.२१
मिरा-भाईंदर – ३८.३४
वसई-विरार – ४६.००
पनवेल – ४४.०४
पुणे – ३९.००
पिंपरी-चिंचवड – ४०.५०
नाशिक – ३९.६४
मालेगाव – ४६.१८
धुळे – ३६.४९
जळगाव – ३४.२७
अहिल्यानगर – ४८.४९
सांगली-मिरज-कुपवाड – ४१.७९
छ. संभाजीनगर – ४३.६७
नांदेड – ४२.४७
लातूर – ४३.५८
सोलापूर – ४०.३९
कोल्हापूर – ५०.८५
परभणी – ४९.१६
जालना – ४५.९४
नागपूर – ४१.२३
अमरावती – ४०.६२
अकोला – ४३.३५
चंद्रपूर – ३८.१२
इचलकरंजी – ४६.२३















