लिओनेल मेस्सीच्या भारतातील टूरची सुरुवात शनिवारी (13 डिसेंबर) कोलकात्यातून झाली.मात्र इथल्या सॉल्ट लेक स्टेडियममधून जे व्हीडिओ समोर येत आहेत, त्यात प्रेक्षक स्टेडियममध्ये बाटल्या आणि खुर्च्या फेकताना दिसत आहेत.मेस्सी कार्यक्रमातून लवकर निघून गेल्यामुळं चाहते नाराज झाले आणि त्यामुळंच स्टेडियममध्ये प्रचंड गोंधळ उडाला असल्याचं म्हटलं जात आहे.
या गोंधळाबाबत पश्चिम बंगालचे डीजीपी राजीव कुमार म्हणाले,”आम्ही मुख्य आयोजकाला आधीच ताब्यात घेतले आहे. या गैरव्यवस्थापनाची शिक्षा मिळालीच पाहिजे यासाठी आम्ही कारवाई करत आहोत…” या गोंधळामुळे पश्चिम बंगालमधील मुख्य विरोधी पक्ष भाजपने तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राज्याचे क्रीडामंत्री अरुप बिस्वास यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपानं केली आहे.
दरम्यान, यासर्व प्रकारामुळे त्याला पाहायला आलेल्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना एका चाहत्यानं तर आज माझं लग्न होतं तरीही मी ते सोडून इथं आलो. पण मेस्सीला नीट पाहाता आलं नाही असं सांगितलं. इतरही अनेक चाहत्यांनी कोलकात्यातील व्यवस्था आवडली नाही असं सांगितलं आहे. मेस्सीच्या आजूबाजूला लोकांचा गराडा होता त्यामुळे आपण त्याची एक झलकही पाहू शकलो नाही अशी खंत चाहत्यांनी व्यक्त केली आहे. हजारो रुपये खर्च करुन इथं आलो पण मेस्सीला नीट पाहाताही आलं नाही असं या चाहत्यांनी सांगितलं.
ममता बॅनर्जी यांनी मागितली माफी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्टेडियममधील ‘अव्यवस्थे’बद्दल दुःख व्यक्त केले आणि माफी मागितली आहे. त्यांनी एक्सवर लिहिले, “सॉल्ट लेक स्टेडियममधील अव्यवस्था पाहून मी हैराण झाले आहे. मी हजारो क्रीडाप्रेमी आणि चाहत्यांसोबत त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्टेडियमकडे जात होते, जिथे सर्वजण आपल्या आवडत्या फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी जमले होते.” त्यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती तयार करणार असल्याचं सांगितले आहे, त्या समितीत मुख्य सचिवही असतील.
मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी लिहिले, “समिती या घटनेची सविस्तर चौकशी करेल, जबाबदारी निश्चित करेल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सूचना देईल.”
पश्चिम बंगालमधील मुख्य विरोधी पक्ष भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे आणि त्यांचं विधान म्हणजे ‘मगरीचे अश्रू’ आहेत असे म्हटले आहे.
भाजप प्रवक्ते अमित मालवीय यांनी एक्सवर लिहिले, “मगरीचेअश्रू ढाळणे थांबवा. हे कुशासन आणि भ्रष्टाचार तुमच्या सरकारच्या प्रत्येक कामात पसरलेले आहे. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालच्या लोकांच्या भावनांवर थेट हल्ला केला आहे आणि प्रत्येक फुटबॉलप्रेमीचा अपमान केला आहे.”
“तुम्ही लवकरात लवकर जबाबदारी निश्चित करा आणि यासाठी जबाबदार असलेल्या लोकांचा राजीनामा सुनिश्चित करा.”
मेस्सीचा दौरा देशातील चार मोठ्या शहरांपुरता मर्यादित असेल. कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली आणि हैदराबाद.
2022 फिफा वर्ल्ड कप विजेता मेस्सी दीड दशकाहून अधिक काळानंतर भारतात परतला आहे. यापूर्वी तो 2009 मध्ये कोलकात्यात एक मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळण्यासाठी भारतात आला होता.














