एकीकडे ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू असताना, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. 14 जून रोजी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व खासदारांची ‘मातोश्री’वर बैठक बोलावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यात येणार असल्याची चर्चा सातत्याने रंगताना दिसतेय. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आता खासदारांची महत्त्वाची बैठक होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी जिल्ह्याच्या संघटनेमध्ये काही बदलही करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय जाधव हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकांनाही उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे 14 तारखेच्या बैठकीमध्ये ते उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागलं आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून ठाकरेसेनेतील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ठाकरे गटातील काही खासदार प्रवेश करणार असल्याचे दावे शिंदे गटातील नेत्यांकडून वेळोवेळी करण्यात आले आहेत. या आधी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तसेच नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटी विकासकामे आणि निधी यांसंदर्भात असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आलं असलं, तरी त्यामागे मोठी राजकीय रणनीती असल्याची चर्चा कायम आहे. त्यानंतर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठाकरेंच्या 9 पैकी 7 खासदारांची उपस्थिती होती असा दावा केला जात होता. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सावध प्रतिक्रिया येत असल्याचं दिसून आलं. आता 14 जून रोजीच्या बैठकीत स्वतः उद्धव ठाकरे या खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता काय मोठी घडामोड घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.













Leave a Reply