पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होत मंत्री नितेश राणे यांनी आमदार रोहित पवार यांच्याबाबत नवं भाकीत वर्तवलं आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वातदेखील एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनावरुन त्यांनी रोहित पवारांवर भाष्य केलं. त्यांच्या या वक्तव्याबाबत नंतर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “रोहित पवार माझे मित्र आहेत. मी काही त्यांना राजकीय शत्रू समजत नाही. उद्या कदाचित माझ्याबरोबर सरकारमध्ये मंत्रीपण असतील. त्यांची तुम्ही चिंता करु नका”, असं नितेश राणे विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले.
“रोहितजी चांगल्याला चांगलं म्हणणाऱ्यांपैकी एक कार्यकर्ता आहेत. पण आता जे काही विद्यार्थ्यांच्या निमित्ताने, आपल्यावर विश्वास ठेवून विद्यार्थी बसले असतील, तर या विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर हे विसरुन चालणार नाही. मला माहिती आहे, माझा हा व्हिडीओ ते बघत आहेत. आपल्या सर्वांना एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. यंत्रणेतील त्रुटी आपल्याला दूर करायचे आहेत. मी सुद्धा एमपीएससी परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवण्यासाठी आंदोलन केलं आहे. चुका सुधारायच्या आहेत”, असं आवाहन नितेश राणे यांनी केलं.
नितेश राणे यांना भाषणानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “तुम्ही बघा टप्प्या टप्प्याने. दिवाळीत कुठे फटाके फुटतात ते बघू. जे निर्णय माझ्या अखत्यारित नाही ते विचारु नका. पण आम्हाला जे काही कळलेलं आहे, म्हणून मी रोहित पवारांना सांगतो की, उगाच टोकाचे संबंध खराब करु नका”, असं नितेश राणे म्हणाले.
“ते माझे चांगले मित्र आहेत. मी विधीमंडळात चांगलं भाषण केलं तर माझं कौतुकही करतात. ते कार्य म्हणून चांगलं आहे की, एमपीएससी सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण विद्यार्थ्यांना वेठीस धरुन करु नका. ज्येष्ठ नेते शरद पवार एवढी चांगली सामंजस्याची भूमिका घेऊ शकतील, एवढे अनुभवी नेते आहेत, त्यांनी राज्य आणि देशात नेतृत्व केलं आहे. मग शरद पवार यांच्या विचारांवर चालणारे जे नेते आहेत, त्यांनी ती भूमिका का घेऊ नये?”, असा सवात नितेश राणे यांनी केला.













