नुकत्याच झालेल्या मुलाखतीत दोन्ही बंधुंनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान सुरु असल्याचा पुन्हा दावा केला. कालही त्यांनी असाच दावा केला होता. तर यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई आणि आजूबाजूचा परिसर वेगळा करण्याचे कारस्थान सुरु असल्याचा दावा केला होता. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान दिल्लीत सुरू आहे. त्यामुळेले मुख्यमंत्री फडणवीस इकडे काय बोलतात त्याला महत्त्व नाही. वर दोघेजण बसलेत त्यांच्या मनात वेगळेच आहे असा दावा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत केला.
सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, त्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सडतोड मत मांडलं. राज ठाकरे म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या हातात काहीच नाही. त्यांची इच्छा चांगली आहे. पण जे वरून म्हणजे दिल्लीतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार. वरून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची, तर त्यांच्यासमोर सही करण्याशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे वरंच्यांच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही. Obey the Order एवढीच फक्त गोष्ट त्यांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांनी चंद्र-सूर्याचे कितीही दाखले दिले तरी वरती जे बसलेले आहेत, मोदी आणि शहा त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय असे राज ठाकरे म्हणाले.
तर मुळात मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जात आहे हे चिंताजनक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कोणीही येतो आणि सांगतो या भागाची भाषा गुजराथी आहे. आमच्यावर हिंदीची सक्ती करणार. म्हणजेच तुम्ही आमची सगळीच अस्मिता व संस्कृती मारणार आणि केवळ नावालाच मुंबई महाराष्ट्रात ठेवणार का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
यावेळी मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात सुरु असलेल्या विकास कामांमागे काय सुप्त हेतू आहे यावरही दोन्ही बंधूंनी भाष्य केले. वाढवण बंदर आणि नवीन मुंबई विमानतळाविषयी राज ठाकरे यांनी भाष्य केलं. तर पालघर, ठाणे परिसरात सुरु असलेल्या विविध विकास योजना या मराठी माणसांसाठी आहेत की इतर कुणासाठी याबाबत ठाकरे बंधुंनी मोठे भाष्य केले. हा भाग गुजरातच्या जवळ असल्याने तिकडे हे उद्योग सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.














