कोकणातल्या कथेवर आधारित असलेला मराठी सिनेमा ‘दशावतार’ सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) गाजतोय. हे आम्ही मनानं नाही सांगत बरं का? शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सिनेमानं चक्क दुसऱ्याच दिवशी कोटींच्या क्लबमध्ये प्रवेशही केला आहे. एवढंच नाहीतर, जगभरातील कमाईत सिनेमानं कोटींच्या कोटी उड्डाणं घेतली आहेत.
‘दशावतार’ सिनेमानं पहिल्या दिवशीच तब्बल 58 लाख रुपये इतकी कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशीही या सिनेमानं बॉक्स ऑफिस दणाणून सोडलंय. शनिवारी ‘दशावतार’ सिनेमाच्या कमाईत चांगलीच वाढ झाल्याचं दिसून येत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘दशावतार’नं दुसऱ्या दिवशी तब्बल 1.39 कोटींची कमाई केली आहे. तर दोनच दिवसांत या सिनेमानं 1.98 कोटींचा गल्ला जमवला आहे.
‘दशावतार’मध्ये मुख्य भूमिकेत दिलीप प्रभावळकर झळकले आहेत. वयाची ऐंशी ओलांडलेल्या दिलीप प्रभावळकरांनी सिनेमात बाबुली मेस्त्रीची भूमिका साकारली आहे. पण, त्यांनी साकारलेल्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. दिलीप प्रभावळकर यांच्याव्यतिरिक्त महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.















