kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी अटकेत; अपहरण व मारहाणीचा गंभीर आरोप

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय तणाव चव्हाट्यावर आला आहे. निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणात नागपूर काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांना पोलिसांनी अटक केली आहे. भाजपला पाठिंबा दिल्याच्या रागातून एका युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. या घटनेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार का करतो म्हणून कळमेश्वर येथून आरीफ खान यांचे अपहरण करत त्यांना मारहाण करणारा काँग्रेस नेता आणि माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी याला अखेर कळमेश्वर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर अटक केली. पोलिसांनी तडक त्याला बुधवारी सकाळी न्यायालयासमक्ष उभे केले असता न्यायालयाने त्याची चार दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.

कळमेश्वर नगर पालिका निवडणूक प्रचारादरम्यान रविवारी अपहरणाची ही घटना घडली होती. कॉँग्रेस सोडून भाजपासाठी काम का करत आहेस, अशी धमकी देत स्थानिक काँग्रेस नेते आणि माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशीने काही सहकाऱ्यांच्या मदतीने आरिफ खान याचे अपहरण केले होते. आरीफ हे कळमेश्वर येथील विसावा बारमध्ये गेले असता रात्री ११ वाजता अपहरणाची ही घटना घडली.

ग्लालबंशी समर्थकांनी आरिफला गोरेवाडा भागात नेत मारहाण केली होती. जखमी अवस्थेत आरिफने कसेबसे रुग्णालय गाठले. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरण आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. कळमेश्वर पोलिसांनी या प्रकरणात आधीच अनिकेत अनिल डाक (२८), रोशन बचन यादव (३२) आणि आशुतोष शैलेश खाली (२५) या तिघांना अटक केली होती. तेव्हापासून हरिश ग्लालबंशी फरार होता. दरम्यान मंगळवारी रात्री पोलिसांनी मुख्य आरोपी माजी नगरसेवक हरिशला अटक केली.