एकीकडे ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. तर दुसरीकडे आता मुंबई महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे नगरसेवक दीपक सावंत यांच्यावर अपात्रतेची कारवाईची घोषणा करण्यात येणार आहे. दीपक सावंत यांच्या अपात्रतेची प्रत महापालिकेकडे दाखल झाली आहे. दीपक सावंत भांडूपमधील प्रभाग क्रमांक 111 मधून निवडणून आले होते.
दीपक सावंत यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले होते. जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर आता दीपक सावंत यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची नगरसेवकांची संख्या 65 वरुन 64 होणार आहे. कुणबी आरक्षित जागेवरून निवडून आले होते. मात्र जात पडताळणी समितीने कुणबी दावा फेटाळला. त्यामुळे आता भांडुपमधील जागा रिक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई महापालिका सभागृहात जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक दीपक सावंत यांच्या अपात्रतेचा निर्णय मंजूर झाला, तर त्याचा थेट परिणाम पालिकेतील विविध समित्यांच्या संख्याबळावर होण्याची शक्यता आहे. दीपक सावंत यांच्या अपात्रतेनंतर ठाकरे गटाची सभागृहातील संख्या 65 वरून 64 होणार आहे. त्यामुळे स्थायी समिती, प्रभाग समिती तसेच इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये ठाकरे गटाला मिळालेल्या प्रतिनिधित्वाच्या समीकरणात बदल होऊ शकतो. समित्यांमध्ये पक्षांच्या संख्याबळाच्या आधारावर सदस्यसंख्या ठरवली जाते. त्यामुळे एका नगरसेवकाची संख्या कमी झाल्यास ठाकरे गटाच्या वाट्याला असलेल्या काही जागांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भांडुपमधील जागा रिक्त झाल्यानंतर आगामी काळात या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता असून, तोपर्यंत पालिकेतील राजकीय गणित बदललेले पाहायला मिळू शकते.













Leave a Reply