आज महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, बहुतांश ठिकाणी भाजपने बहूमत मिळवले आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचाही समावेश आहे. अशातच, भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. मुंबई महापालिकेतील निकालाचे कल स्पष्ट होताच भाजप आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ट्वीटरवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या पोस्टमध्ये नितेश राणे जोरजोरात हसताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ २२ सेकंदाचा आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना डिवचले आहे. तसेच त्यांना खोचक टोला लगावला आहे. उद्धवजी आणि पेंग्विन ला… जय श्री राम!, असे नितेश राणे यांनी कॅप्शन दिले आहे. एकीकडे मुंबईतील सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र नितेश राणे यांच्या या प्रतिक्रियेने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
नितेश राणेंची प्रतिक्रिया
नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खोचक टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे आणि इतर सर्वांना जय श्री राम. आज जो भगवा झंझावात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्व महापालिकेत आमचा महापौर बसण्याची पूर्ण तयारी झाली आहे. सर्व महापालिकेच्या मतदार बंधू भगिनींचे आभार मानेन. यामुळे महाराष्ट्राकडे देशाकडे निश्चितपणे वाकड्या नजरेने बघणाऱ्या हे जे जिहादी या सर्वांना एक कडक संदेश मिळताना दिसत आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले ना, तसं त्यांनी संध्याकाळी इस्लामाबादची फ्लाईट आहे. त्याच्यात बसायचं आणि पाकिस्तान जायचं, तिकडे अल्लाहू अकबर म्हणत राहायचं, असे नितेश राणे म्हणाले.













