kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सोनम रघुवंशी व राज कुशवाह यांच्या चौकशीत काय घडतंय?

इंदोरच्या राजा रघुवंशीची मेघालयमधील शिलाँग येथे हत्या झाली असून त्याची पत्नी सोनम रघुवंशीनंच राज कुशवाहसोबत मिळून हत्येचा कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यासंदर्भात आता सोनम रघुवंशी व राज कुशवाह यांची पोलीस कोठडीत चौकशी चालू असून त्यातून अनेक बाबी पोलिसांसमोर उघड होत आहेत. एकीकडे सोनम रघुवंशी व राज कुशवाह यांचं नेमकं काय नातं आहे? याची चौकशी पोलीस करत असताना दुसरीकडे नेमकं जिथे राजाची हत्या झाली, तिथपर्यंत हे सगळे कसे पोहोचले? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

या दोघांची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशी व राज कुशवाह या दोघांनीही चौकशीदरम्यान आपण राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचल्याचा दावा फेटाळला आहे. तसेच, आता हे दोघे एकमेकांवरच आरोप करू लागले आहेत, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलीस सध्या सोनम रघुवंशी, राज कुशवाह यांच्यासह राजाच्या हत्येची सुपारी देण्यात आलेल्या चार आरोपींची चौकशी करत आहेत. त्यातून राजाच्या हत्येवेळी घटनास्थळी नेमकं काय घडलं? यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाली आहे. त्यानुसार, सुपारी देण्यात आलेल्या मारेकऱ्यांपैकी एक आरोपी विशालनं आधी राजाच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर त्याचा मृतदेह दरीत फेकून दिला. आपल्याला फोटो काढायचा आहे, असं सांगून सोनम रघुवंशी स्वत: राजाला त्या ठिकाणी घेऊन गेली होती, अशीही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

पोलीस तपासात मारेकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी राजा रघुवंशीचा मृतदेह फेकण्यासाठी सोनमचीच मदत घेतली. त्यानंतर ते स्कूटरवर एकत्रच तिथून निघाले आणि पुढे वेगवेगळ्या मार्गांनी ठरलेल्या ठिकाणी निघून गेले. दरम्यान, याप्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीचे प्रमुख हर्बर्ट पायनियाड खारकोंगोर यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत सर्व आरोपींची उलटतपासणी घेण्यात आली. आरोपींमध्ये झालेलं पैशांचं हस्तांतरण, हत्येचा कट कसा रचण्यात आला यासंदर्भात अद्याप माहिती गोळा केली जात आहे.